IPL 2022: आजपासून ‘दस का दम’; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

मुंबई : क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणून धरलेल्या आयपीएलच्या १५व्या सत्राला शनिवारपासून सुरुवात होईल. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या लढतीने यंदाच्या आयपीएलचे बिगुल वाजेल. यावेळी सर्वांचे लक्ष असेल ते महेंद्रसिंग धोनीवर. गुरुवारीच त्याने धक्कादायक निर्णय घेताना सीएसके संघाचे कर्णधारपद सोडले आणि संघाची धुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपविली. त्यामुळे धोनी आणि जडेजाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. यंदा विजेतेपदासाठी दहा संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या नव्या संघाच्या कामगिरीची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भारतात प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएल सामने रंगणार असल्याने यंदाच्या सत्राला विशेष महत्त्व आले आहे. गेल्यावर्षी आयपीएलचे पहिले सत्र भारतात आयोजित झाले खरे, पण त्यावेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी नव्हती. तसेच स्पर्धा मध्यावर आली असताना कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएल स्थगित करण्याची वेळ आली. यानंतर स्पर्धेचे दुसरे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. यावेळी, २५ टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशास परवानगी मिळाल्याने खेळाडूंमध्येही उत्साह संचारला आहे. दोन नव्या संघांच्या समावेशाने यंदा साखळी सामन्यांची संख्याही वाढली आहे. यंदा ६० साखळी सामन्यांऐवजी ७४ सामने रंगतील. त्यामुळे यंदाची आयपीएल दोन महिन्यांहून अधिक काळ रंगेल. गेल्यावेळची ठेच आहे लक्षात!

Leave a Reply

Your email address will not be published.