काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

औरंगाबाद : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरुन, वक्तव्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना, टीका-टिप्पणी होताना पाहायला मिळते. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आताचे भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर आणि खास करुन काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला सकाळी लगावला. सुजय विखे पाटील यांच्या या टीकेला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार, असा पलटवार पटोले यांनी केलाय. ते आज औरंगाबादेत बोलत होते. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारलं. त्यावेळी काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार. सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, ‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.