योगी सरकार 2.0! नव्या मंत्र्यांसाठी 60 बंगले आणि 200 कार तयार, जाणून घ्या संपूर्ण तयारी…

उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या शपथविधीची तयारी लखनौच्या अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर सुरू आहे. तर दुसरीकडे शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांसाठी कार आणि बंगल्यांचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. बंगल्यांच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण झालं आहे. राज्याच्या मालमत्ता विभागानं नव्या मंत्र्यांसाठी मंत्री आवास तयार केले आहेत. राज्याच्या मालमत्ता विभागाकडे नेमके किती मंत्री शपथ घेणार याची माहिती नसली तरी उत्तर प्रदेश विधानसभेतील आमदारांच्या संख्येच्या आधारे एकूण ६० मंत्र्यांसाठी बंगले तयार करण्यात आले आहेत. खरंतर सर्व ४०३ आमदारांना आमदार निवासाची व्यवस्था करण्यात येईलच. पण विद्यमान सरकारचे मंत्री अजूनही सरकारी आवासातच वास्तव्याला आहेत. मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालं की संबंधित मंत्री आहे त्याच निवासस्थानात वास्तव्य करणार आहेत. याशिवाय कोणताही विद्यमान मंत्री पुन्हा मंत्रिमंडळाचा भाग बनला नाही तर त्याला १५ दिवसांत बंगला रिकामा करावा लागेल आणि तो बंगला दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल. नव्या मंत्र्यांसाठीही बंगले तयार करण्यात आले आहेत. ज्यांचं गरजेनुसार वाटप केलं जाईल. याशिवाय सुमारे २०० कार राज्याच्या मालमत्ता विभागानं सज्ज ठेवल्या आहेत.

25 मार्च भव्य शपथविधी सोहळा योगी सरकारचा शपथविधी सोहळा भव्य दिव्य होण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी केली आहे. एकना स्टेडियमवर सुमारे 70 हजार लोकांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनीही यासाठी पत्र जारी केलं आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी 24 मार्च रोजी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. यासाठी केंद्रीय निरीक्षक गृहमंत्री अमित शहा आणि रघुवर दास 23 मार्चला लखनौला पोहोचणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.